टिटवाळा | प्रतिनिधी : टिटवाळा येथील रीजेंसी सर्वम (Regency Sarvam) संकुलामध्ये गेल्या काही दिवसांपासून कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. वाढत्या कचऱ्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले असून, याप्रकरणी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी बिल्डर कार्यालय, बिल्डरच्या लीगल टीम तसेच केडीएमसी अधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करायला पाहिजे.
यावेळी OWC (कचरा प्रक्रिया) प्लांटचे स्थलांतर व तातडीने कार्यान्वयन, क्लब हाऊस व स्विमिंग पूलची कायदेशीर कागदपत्रे, STP प्लांट, फ्लश लाईन व जेट स्प्रेच्या चुकीच्या जोडण्या, क्लब हाऊस मेंबरशिप, २४ तास पिण्याच्या पाण्याच्या आश्वासनाची पूर्तता आदी अनेक मुद्दे बिल्डरच्या लीगल टीमसमोर मांडण्यात आले.
फेडरेशनने बिल्डरला स्पष्ट इशारा दिला आहे की, शनिवारी कचरा उचलला गेला नाही तर रविवारी सकाळी १० वाजता रीजेंसी सर्वम (Regency Sarvam) मधील मंदिरासमोर सर्व रहिवासी एकत्र येतील आणि त्यानंतर घरातील कचरा घेऊन बिल्डर कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करतील.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर फेडरेशनच्या नेतृत्वावरही अनेक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा WhatsApp द्वारे पाठपुरावा करूनही मूलभूत प्रश्न मार्गी लागले नाहीत. त्यामुळे विद्यमान फेडरेशन अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा आणि तातडीने पारदर्शक निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
काही रहिवाशांचे म्हणणे आहे की, "देशात जबाबदारी निश्चित होऊ शकते, तर आपल्या सोसायटीतही उत्तरदायित्व निश्चित झाले पाहिजे. आता सर्व नागरिकांनी जागे होऊन आपल्या हक्कासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे."
यामुळे टिटवाळा रीजेंसी सर्वम (Regency Sarvam) मधील कचरा प्रश्न आणि इतर प्रलंबित सुविधांवरून बिल्डर तसेच फेडरेशनच्या कार्यपद्धतीबाबत रहिवाशांमध्ये तीव्र असंतोष असल्याचे चित्र समोर येत असून, आता प्रशासन आणि संबंधितांकडून ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0 Comments