उल्हासनगर | प्रतिनिधी
उल्हासनगर-1 पोलीस ठाण्याच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कथित अनधिकृत शेडमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर नागरिकांना ये-जा करण्यासाठी पुरेशी जागा नसताना अशा प्रकारचे शेड उभारल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याप्रकरणी अॅड. अर्जुन वाघमारे यांनी उल्हासनगर महानगरपालिकेकडे लेखी तक्रार दाखल करून सदर शेडची कायदेशीरता तपासण्याची तसेच ते अनधिकृत असल्यास तात्काळ तोडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीत असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे की, जर अशाच प्रकारचे अनधिकृत शेड किंवा बांधकाम एखाद्या सामान्य नागरिकाने केले असते, तर आतापर्यंत महानगरपालिकेने गुन्हा दाखल करून तोडक कारवाई केली असती. मग पोलीस विभागाशी संबंधित असल्याने या प्रकरणात वेगळा नियम लागू आहे का? कायदा सर्वांसाठी समान नाही का?
अॅड. अर्जुन वाघमारे यांनी पुढे मागणी केली आहे की, तपासात सदर शेड अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 (MRTP Act) मधील लागू तरतुदींनुसार संबंधित जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करण्यात यावी. कोणतीही शासकीय यंत्रणा किंवा विभाग कायद्यापेक्षा मोठा नसून कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे.
आता उल्हासनगर महानगरपालिका या तक्रारीची दखल घेऊन वस्तुस्थितीची पडताळणी करून कायदेशीर कारवाई करते का, की हे प्रकरणही इतर तक्रारींप्रमाणे फाईलपुरतेच मर्यादित राहते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
"कायदा सर्वांसाठी समान आहे" हे प्रशासन कृतीतून सिद्ध करणार का? असा प्रश्न आता उल्हासनगरकर विचारत आहेत.
0 Comments