Hamara Mahanagar News

गुवाहाटी दौऱ्यापेक्षा विकासाला प्राधान्य ! अनुभवी राजेंद्र चौधरी आणि युवा नेतृत्व विक्की भुल्लर यांची दिल्लीत धाव; उल्हासनगरच्या विकासासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन


उल्हासनगर | प्रतिनिधी
उल्हासनगरमध्ये सध्या गुवाहाटी दौऱ्याची राजकीय चर्चा रंगली असतानाच, दुसरीकडे शहराच्या विकासासाठी काम करणारे काही अनुभवी शिवसेना पदाधिकारी थेट दिल्लीत जाऊन विकासकामांचा पाठपुरावा करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे.
सोशल मीडियावर अनेकांकडून अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे की, "जे नेते प्रत्यक्ष कामावर विश्वास ठेवतात, त्यांनी गुवाहाटी दौऱ्याऐवजी आपल्या प्रभागातील आणि शहराच्या विकासाच्या प्रश्नांना प्राधान्य देत थेट दिल्ली गाठली."
याच पार्श्वभूमीवर शिवसेना महानगरप्रमुख तथा नगरसेवक श्री. राजेंद्र चौधरी आणि युवासेना कल्याण लोकसभा सचिव श्री. हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर यांनी नवी दिल्ली येथे शिवसेना संसदीय गटनेते तथा कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत उल्हासनगरच्या विविध विकासकामांसंदर्भात लेखी निवेदन सादर केले.

यावेळी श्री. कैलास तेजी तसेच समाजसेवक श्री. युवराज बदाने उपस्थित होते.

बैठकीमध्ये उल्हासनगर महानगरपालिकेतील पहिली क्लस्टर डेव्हलपमेंट योजना गतीने राबविणे, प्रभाग क्रमांक १० मधील विठ्ठलवाडी व खन्ना कंपाऊंड परिसरात एमएमआरडीएच्या माध्यमातून विकासकामे हाती घेणे, तसेच प्रभाग क्रमांक १० मधील बोट क्लब शासनाच्या निधीतून विकसित करणे आदी महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या सर्व मागण्यांचे लेखी निवेदन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना सादर करण्यात आले असून, शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात आली.

दरम्यान, सोशल मीडियावर आणखी एका विषयाची जोरदार चर्चा रंगली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेतृत्व असलेले राजेंद्र चौधरी आणि युवा, आक्रमक नेतृत्व म्हणून ओळख असलेले हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर ही जोडी एकत्रितपणे शहराच्या विकासासाठी सक्रिय झाल्याने नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत.

"एकीकडे अनुभव, तर दुसरीकडे युवाशक्ती... या दोघांच्या समन्वयातून उल्हासनगरला नवी दिशा मिळू शकते," अशा आशयाच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच "आता ही जेष्ठ-युवा जोडी शहरासाठी निश्चितच काहीतरी मोठे करेल," अशीही चर्चा नागरिकांमध्ये आणि शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्येही या भेटीनंतर वेगळीच चर्चा सुरू असून, शहराच्या विकासासाठी अनुभवी नेतृत्व आणि युवा नेतृत्व एकत्र आल्यास आगामी काळात उल्हासनगरच्या विकासाला नवी गती मिळू शकते, असा विश्वास अनेकांकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, "दौरे नव्हे, तर विकासासाठी धाव घेणारे नेतेच शहराला पुढे नेतात," अशा आशयाच्या प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असून, गुवाहाटी दौऱ्याच्या चर्चेसोबतच विकासकामांसाठी थेट दिल्लीत धाव घेणाऱ्या या जेष्ठ-युवा जोडीची शहरात विशेष चर्चा रंगली आहे.

Post a Comment

0 Comments