उल्हासनगर : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणी व गणेशोत्सव आयोजनासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी ‘एक खिडकी’ पद्धतीने देण्यात याव्यात, तसेच महानगरपालिकेकडून आकारण्यात येणारे परवानगी शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख व ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह वी. भुल्लर (महाराज) यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापौर व महानगरपालिका आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे.
उल्हासनगर शहरात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि सामाजिक सलोखा राखून साजरा केला जातो. शहरातील विविध भागांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे नागरिकांच्या सहभागातून गणेशोत्सवाचे आयोजन करतात. मंडप उभारणी, विद्युत व्यवस्था, सजावट तसेच इतर आवश्यक बाबींवर मंडळांकडून मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो.
त्यात विविध विभागांकडून परवानग्या घेण्यासाठी होणारी धावपळ आणि आकारण्यात येणारे शुल्क यामुळे गणेशोत्सव मंडळांवर अतिरिक्त आर्थिक व प्रशासकीय भार पडतो. त्यामुळे मंडळांच्या अडचणी लक्षात घेऊन मंडप उभारणी व गणेशोत्सव आयोजनासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या एकाच खिडकीवरून देण्यात याव्यात, अशी मागणी भुल्लर महाराज यांनी केली आहे.
महापालिका, अग्निशमन, विद्युत, वाहतूक विभागांच्या परवानग्या एकाच ठिकाणी
गणेशोत्सव मंडळांना विविध विभागांच्या परवानग्यांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागू नयेत. महानगरपालिका, अग्निशमन, विद्युत, वाहतूक तसेच संबंधित इतर विभागांच्या आवश्यक परवानग्या ‘एक खिडकी योजने’अंतर्गत एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
ही प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यात यावी, जेणेकरून गणेशोत्सव मंडळांना अनावश्यक प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागू नये, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
परवानगी शुल्क माफ करण्याची मागणी
गणेशोत्सव हा सार्वजनिक व धार्मिक उत्सव असून तो सर्वसामान्य नागरिकांच्या सहभागातून साजरा केला जातो. त्यामुळे उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणी व गणेशोत्सव आयोजनासाठी आवश्यक असलेली महानगरपालिकेची परवानगी निःशुल्क देण्यात यावी, अशीही मागणी राजेंद्रसिंह भुल्लर महाराज यांनी केली आहे.
“गणेशोत्सव मंडळांना परवानग्यांसाठी वेगवेगळ्या विभागांमध्ये हेलपाटे मारावे लागू नयेत. सर्व आवश्यक परवानग्या एकाच खिडकीवरून देण्यात याव्यात आणि परवानगी शुल्क माफ करून मंडळांना सहकार्य करण्यात यावे,” अशी मागणी भुल्लर महाराज यांनी केली आहे.
महानगरपालिका प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ‘एक खिडकी’ पद्धतीने सर्व परवानग्या आणि शुल्कमाफीबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
0 Comments