ण
उल्हासनगर | प्रतिनिधी
शिवसेना उल्हासनगर शहर शाखेच्या अधिकृत सोशल मीडिया आयडीवर "जुनी आठवण... संघर्षाची, निष्ठेची आणि शिवसेनेच्या सुवर्णकाळाची!" या आशयाची पोस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर ती व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये श्री. राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज), श्री. राजेंद्र चौधरी आणि श्री. रमेश चव्हाण या "RRR" तिकडीच्या संघर्षमय प्रवासाचा उल्लेख करण्यात आला असून, त्यानंतर उल्हासनगरातील शिवसैनिकांमध्ये नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
अनेक जुन्या शिवसैनिकांनी या पोस्टचे स्वागत करत, "ही तिकडी पुन्हा एकत्र दिसावी," अशी भावना व्यक्त केली आहे. अनेकांच्या मते, एकेकाळी संघटना वाढविणे, शिवसैनिकांच्या पाठीशी उभे राहणे, हिंदुत्वाची भूमिका ठामपणे मांडणे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणे या कामांमुळे या तिघांनी शिवसेनेला वेगळी ओळख मिळवून दिली होती.
दरम्यान, सोशल मीडियावर फिरत असलेल्या काही पोस्टमध्ये एका शिवसैनिकाच्या नावाने असा दावा करण्यात आला आहे की, "आज स्वतःला मोठे नेते समजणाऱ्या काही लोकांना एकेकाळी याच त्रिमूर्तीने राजकीय लढा दिला होता. आज विविध पक्षांतून आलेले काही लोक नेतृत्व करत असले, तरी या त्रिमूर्तीने कोणाची हुजरी गिरी न करता, संघर्षाच्या बळावर आणि गुंड प्रवृत्तीला राजकीय आव्हान देत स्वतःचे स्थान निर्माण केले."
याचबरोबर, सोशल मीडियावर आणखी एक चर्चेचा मुद्दा समोर आला आहे. काही पोस्टमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, "उल्हासनगर शिवसेनेत शकुनीसारख्या राजकारणामुळे पक्षाची एकजूट कमकुवत झाली. पूर्वी एकनिष्ठपणे काम करणारे अनेक शिवसैनिक वेगवेगळ्या गटांत विभागले गेले. मात्र आता शहरातील काही पदाधिकाऱ्यांनी 'आम्ही एकत्र' असा संदेश देणारी पोस्ट व्हायरल केल्याने पुन्हा एकदा संघटनात्मक एकतेच्या चर्चांना उधाण आले आहे."
या व्हायरल पोस्टनंतर आता शहरात एकच प्रश्न विचारला जात आहे—उल्हासनगर शिवसेनेतील विविध गट पुन्हा एकत्र येऊन संघटना मजबूत करतील का, की सध्याची गटबाजी कायम राहणार? याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क सुरू असून, शिवसैनिकांमध्येही उत्सुकता वाढली आहे.
सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे—"RRR पुन्हा एकत्र येणार का..? आणि त्यातून उल्हासनगर शिवसेनेत नवी एकजूट निर्माण होणार का..?" येत्या काळात याचे उत्तर मिळेल; मात्र या एका पोस्टने उल्हासनगरच्या राजकीय वातावरणात नव्याने खळबळ उडवली आहे.
0 Comments