उल्हासनगर | उल्हासनगर-1 येथील दुलीचंद कॉलेजसमोरील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरभोवती नुकतीच उभारण्यात आलेली सुरक्षा फेन्सिंग अवघ्या 24 तासांतच नुकसानग्रस्त झाल्याने महावितरणच्या कामाच्या दर्जावर आणि संबंधित ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित काम इतक्या कमी वेळात निकृष्ट ठरणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेत युवासेना कल्याण लोकसभा सचिव हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर यांनी महावितरणचे मुख्य अभियंता, कल्याण यांना लेखी निवेदन देत संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
भुल्लर यांनी आपल्या निवेदनात निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला तात्काळ ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, संबंधित ठेकेदाराचे बिल तात्काळ रोखण्यात यावे तसेच अशा ठेकेदाराला काम मंजूर करणाऱ्या आणि कामाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, ट्रान्सफॉर्मरसारख्या धोकादायक ठिकाणी उभारण्यात आलेली सुरक्षा फेन्सिंग जर एका दिवसातच तुटत असेल, तर हा केवळ सरकारी निधीचा अपव्यय नसून नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रकार आहे. अशा निकृष्ट कामामुळे भविष्यात गंभीर दुर्घटना घडू शकते.
याशिवाय, या निकृष्ट फेन्सिंगमुळे भविष्यात कोणताही अपघात होऊन एखाद्या नागरिकाच्या जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील, अशी स्पष्ट मागणीही हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर यांनी आपल्या निवेदनातून केली आहे.
युवासेनेने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, भविष्यात अशा निष्काळजीपणाची पुनरावृत्ती होऊ नये आणि नागरिकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होऊ नये, अशी भूमिका घेतली आहे.
0 Comments