Hamara Mahanagar News

ठाणे दुर्घटनेतून धडा घ्या! उल्हासनगरातील जर्जर इमारती व लोखंडी फ्रेमवरील होर्डिंग तातडीने हटवा; प्रत्येक होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट व QR Code सक्तीचा करा – युवासेना कल्याण लोकसभा सचिव हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर


उल्हासनगर | प्रतिनिधी
ठाणे येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरातही अशी दुर्दैवी घटना घडू नये, यासाठी युवासेना कल्याण लोकसभा सचिव हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर यांनी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तांना सविस्तर निवेदन सादर करून शहरातील जर्जर इमारतींवर तसेच धोकादायक लोखंडी फ्रेमवर उभारण्यात आलेले होर्डिंग तातडीने हटविण्याची मागणी केली आहे.
निवेदनात भुल्लर यांनी नमूद केले आहे की, उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील अनेक जर्जर इमारतींवर तसेच गंजलेल्या व कमकुवत झालेल्या लोखंडी फ्रेमवर मोठ्या आकाराची होर्डिंग लावण्यात आली आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात मुसळधार पाऊस, तुफानी वारे आणि वादळी हवामानामुळे ही होर्डिंग किंवा त्यांची लोखंडी संरचना कधीही कोसळू शकते. अशा परिस्थितीत मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाण्यात घडलेली दुर्घटना ही गंभीर इशारा असून, उल्हासनगरमध्ये अशी घटना घडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

भुल्लर यांनी महापालिकेकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत:

शहरातील सर्व होर्डिंगचे तातडीने तांत्रिक सर्वेक्षण करण्यात यावे.

जर्जर इमारतींवरील तसेच धोकादायक लोखंडी फ्रेमवरील सर्व होर्डिंग त्वरित हटविण्यात यावीत.

प्रत्येक होर्डिंगचे स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट करून त्याचा ऑडिट रिपोर्ट महापालिकेकडे सादर करणे बंधनकारक करण्यात यावे.
मुंबई महानगरपालिका (BMC), ठाणे महानगरपालिका (TMC) आणि पुणे महानगरपालिका (PMC) यांच्या धर्तीवर उल्हासनगर शहरातील प्रत्येक अधिकृत होर्डिंगवर QR Code लावणे सक्तीचे करण्यात यावे. त्या QR Code मध्ये होर्डिंगचा परवाना क्रमांक, परवानगीची मुदत, मालकाचे नाव, स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट, संबंधित स्ट्रक्चरल अभियंत्याचे प्रमाणपत्र, महापालिकेची मंजुरी व इतर आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.
नियमबाह्य व अनधिकृत होर्डिंग तात्काळ हटवून संबंधित जाहिरातदार, एजन्सी तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
याबाबत हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर म्हणाले, "दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा ती होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात तुफानी वारे आणि मुसळधार पावसामुळे धोकादायक होर्डिंग कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे प्रत्येक होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा ऑडिट रिपोर्ट तयार करणे आवश्यक आहे. तसेच मुंबई महानगरपालिका (BMC), ठाणे महानगरपालिका (TMC) आणि पुणे महानगरपालिका (PMC) यांच्या धर्तीवर QR Code प्रणाली लागू केल्यास प्रत्येक होर्डिंगची माहिती नागरिकांना एका स्कॅनमध्ये उपलब्ध होईल आणि अनधिकृत तसेच धोकादायक होर्डिंगवर प्रभावी नियंत्रण ठेवता येईल."

या निवेदनामुळे उल्हासनगरातील धोकादायक होर्डिंगच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने तातडीने व्यापक सर्वेक्षण, स्ट्रक्चरल ऑडिट, QR Code प्रणालीची अंमलबजावणी आणि धोकादायक होर्डिंगवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आता उल्हासनगर महानगरपालिका या मागण्यांवर कितपत आणि किती वेगाने कारवाई करते, याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments