Hamara Mahanagar News

भाजप नेत्याच्या मुलाच्या कारची दुचाकीला धडक; मजूराचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर जखमी — कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह..?


उल्हासनगर
कल्याण येथील प्रसिद्ध सुवर्ण व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक तसेच भाजपचे नेते प्रकाश मुथा यांचा मुलगा अविनाश मुथा याला प्राणघातक अपघातप्रकरणी उल्हासनगर-1 पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर प्रभावशाली व्यक्तींशी संबंधित प्रकरणांमध्ये कायद्याची समान अंमलबजावणी होते का, यावर नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार (दि. 13 जुलै 2026) रोजी सकाळी सुमारे 9.20 वाजता बिरला गेट येथील कमल लॉजसमोर फर्निचर कारखान्यात काम करणारे 51 वर्षीय देवेंद्रसिंग रामचंद्र राजपूत हे आपल्या मुलाला शहाड रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी अ‍ॅक्टिव्हा (MH-05 DL-6085) वरून जात होते. त्याचवेळी मागून भरधाव आलेल्या कारने (MH-05 EJ-4041) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, धडकेनंतर देवेंद्रसिंग राजपूत रस्त्यावर पडले आणि कार त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी संतप्त नागरिकांनी कार चालकाला पळून जाऊ दिले नाही. माहिती मिळताच उल्हासनगर-1 पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चालक अविनाश मुथा याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अटक केली.

मृत देवेंद्रसिंग राजपूत हे मूळचे उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांच्या एका मुलाची भारतीय सैन्यात सेवा असून दुसरा मुलगा मुंबईत नोकरी करतो. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, देवेंद्रसिंग हे दररोज आपल्या मुलाला शहाड रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी व आणण्यासाठी जात असत.

या घटनेनंतर राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली असून, प्रभावशाली राजकीय कुटुंबातील व्यक्तींचे नाव गंभीर गुन्ह्यात समोर आल्यास कायद्याची निष्पक्ष अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दोष सिद्ध झाल्यास आरोपीवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

सध्या उल्हासनगर-1 पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Post a Comment

0 Comments