Hamara Mahanagar News

उल्हासनगरातील बेकायदेशीर RO व पाणी जार प्रकल्पांवर (प्लांट) कारवाईची मागणी; युवासेना कल्याण लोकसभा सचिव हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर आक्रमक, कारवाई कधीही होण्याची शक्यता!


उल्हासनगर | प्रतिनिधी
उल्हासनगर शहरातील आरओ (RO) व पाणी जार प्रकल्पांची सखोल तपासणी करून बेकायदेशीर व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी युवासेना कल्याण लोकसभा सचिव हरजिंदर सिंह भुल्लर (विक्की) यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) महाराष्ट्र राज्याचे आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.तसेच उल्हासनगर शहरातील काही दुकानदार व कंपनी तसेच प्लांट चे लिस्ट सुद्धा पत्रा सोबत त्यांनी दिला आहे...!
उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असताना उल्हासनगरमधील अनेक आरओ व पाणी जार प्रकल्पांकडे FDA ची वैध नोंदणी, आवश्यक परवाने तसेच गुणवत्ता तपासणीची कागदपत्रे नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शुद्ध पिण्याचे पाणी पुरविणे ही संबंधित प्रकल्प चालकांची जबाबदारी असून, दूषित किंवा निकृष्ट दर्जाचे पाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकते. त्यामुळे या प्रकल्पांची नियमित तपासणी, पाण्याचे नमुने संकलित करून प्रयोगशाळा चाचणी आणि गुणवत्ता नियंत्रणाची अंमलबजावणी होणे अत्यावश्यक असल्याचे भुल्लर यांनी म्हटले आहे.
प्रमुख मागण्या

▪️ उल्हासनगरमधील सर्व RO व पाणी जार प्रकल्पांची विशेष तपासणी करण्यात यावी.

▪️ FDA नोंदणी, परवाने व इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी.

▪️ सर्व प्रकल्पांमधून पाण्याचे नमुने घेऊन अधिकृत प्रयोगशाळेत गुणवत्ता चाचणी करण्यात यावी.

▪️ बेकायदेशीर किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

▪️ शहरातील एकूण प्रकल्पांची संख्या व त्यापैकी वैध परवाना असलेल्या प्रकल्पांची माहिती सार्वजनिक करण्यात यावी.

▪️ नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात याव्यात.

यावेळी हरजिंदर सिंह भुल्लर (विक्की) यांनी सांगितले की, "नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये. FDA प्रशासनाने तातडीने उल्हासनगर शहरात विशेष मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी."

या निवेदनामुळे उल्हासनगरातील RO व पाणी जार व्यवसायाच्या नियमबाह्य कारभाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, FDA प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments