गरीब रुग्णांना दमदाटी करण्यासाठी बाऊन्सर- बॉडीगार्ड, मात्र भटक्या कुत्र्यांना VIP ट्रीटमेंट..?
उल्हासनगर महानगरपालिकेच्या म्हारळ हॉस्पिटलमधील धक्कादायक परिस्थितीवर शिवसेना विभागप्रमुख प्रमोद पांडेय यांचा संताप
उल्हासनगर :
उल्हासनगर महानगरपालिकेच्या म्हारळ येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये भटक्या कुत्र्यांचा मुक्त वावर असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून रुग्णांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हॉस्पिटल परिसरात तसेच काही विभागांच्या जवळ कुत्रे फिरत असल्यामुळे महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रुग्ण उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये येत असताना कुत्र्यांचे भुंकणे, अचानक समोर येणे तसेच वॉर्ड परिसरात फिरणे यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही नागरिकांनी आरोप केला आहे की, हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे स्वच्छता आणि सुरक्षेचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत.
विशेष म्हणजे, आरोग्य सेवा देणाऱ्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारे भटक्या प्राण्यांचा वावर असल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रुग्णांच्या अन्नपदार्थांजवळ तसेच वॉर्ड परिसरात कुत्रे दिसत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
याप्रकरणी शिवसेना विभागप्रमुख प्रमोद पांडेय यांनी संताप व्यक्त करत उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.
“गरीब रुग्णांना दमदाटी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये बाऊन्सर आणि बॉडीगार्ड ठेवले जातात, मात्र भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडे वेळ नाही. आयुक्त महोदय रोज या मार्गाने ये-जा करतात, पाहणी करतात; पण प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल दिसत नाही,” असे आरोप त्यांनी केले.
स्थानिक नागरिकांनी महानगरपालिका आयुक्त आणि आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेऊन हॉस्पिटल परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, सुरक्षा आणि स्वच्छतेच्या उपाययोजना कठोरपणे राबवाव्यात, अशी मागणी केली आहे.
0 Comments