Hamara Mahanagar News

खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे थेट आव्हान; ठाणे जिल्हा मधे राजकीय रणधुमाळी..!कल्याण लोकसभा युवासेना सचिव आक्रमक, हरजिंदर भुल्लर (विक्की) यांची गणेश नाईकांवर जोरदार शब्दांत टीका


उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यात राजकीय वातावरण सध्या अत्यंत तापलेले असून शिवसेना आणि युवासेना कार्यकर्ते आक्रमक पवित्र्यात मैदानात उतरल्याचे चित्र दिसत आहे. काल खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी जाहीर व्यासपीठावरून मंत्री गणेश नाईक यांना थेट राजकीय आव्हान दिल्यानंतर आज त्याचे पडसाद संपूर्ण परिसरात उमटताना दिसत आहेत.
शिंदे यांच्या वक्तव्यानंतर अवघ्या २४ तासांत शिवसेना आणि युवासेना पदाधिकारी अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज कल्याण युवासेना लोकसभा सचिव हरजिंदर सिंह भुल्लर (विक्की) यांनी फेसबुक पोस्ट करत गणेश नाईक यांच्यावर तीव्र शब्दांत निशाणा साधला.
“कुत्र्याने आपल्या दगडाच्या खाणी राखाव्यात, पैसा ओरबाडावा… विकासाच्या रथाबरोबर स्पर्धा करण्याची त्याची लायकी नाही,” अशा शब्दांत भुल्लर यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

भुल्लर यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेत विरोधकांना थेट आव्हान देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. स्थानिक पातळीवर बैठका, चर्चा आणि कार्यकर्त्यांच्या हालचालींना वेग आल्याचेही दिसून येत आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, श्रीकांत शिंदे यांच्या आव्हानानंतर शिवसेना-युवासेना संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत. विकासकामे विरुद्ध कथित आर्थिक व्यवहार या मुद्द्यांवरून दोन्ही बाजूंमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, गणेश नाईक किंवा त्यांच्या गटाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या घडामोडींमुळे राजकारण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी काळात या राजकीय संघर्षाला कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...!

Post a Comment

0 Comments