Hamara Mahanagar News

थकबाकीपोटी 'रिजेन्सी सर्वम'चा पाणीपुरवठा खंडित; केडीएमसीची टिटवाळ्यात धडक कारवाई

थकबाकीपोटी 'रिजेन्सी सर्वम'चा पाणीपुरवठा खंडित; केडीएमसीची टिटवाळ्यात धडक कारवाई
​टिटवाळा : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी आता आक्रमक पाऊल उचलले आहे. टिटवाळा येथील प्रसिद्ध 'रिजेन्सी सर्वम' या गृहसंकुलाने कोट्यवधी रुपयांचा कर थकवल्यामुळे, महापालिकेने या संकुलाचा पाणीपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई केली आहे.
​महानगरपालिकेच्या 'अ' प्रभाग क्षेत्रात येणाऱ्या टिटवाळा स्थानक परिसरातील 'रिजेन्सी सर्वम' सोसायटीमधील सदनिकाधारकांकडे सुमारे १ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. तसेच, या सोसायटीतील एकूण ३५ इमारतींचे ५० लाख रुपयांचे पाणी बिल अद्याप भरलेले नाही. वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्याने, काल सायंकाळी पालिकेच्या पथकाने या सर्व इमारतींचा पाणीपुरवठा खंडित केला.
​दुसरीकडे 'अ' प्रभागातील ९ अनिवासी अनधिकृत मालमत्ताधारकांनी वारंवार सूचना देऊनही मालमत्ता कर भरला नव्हता. त्यामुळे आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार, या नऊही मालमत्तांवर निष्कासनाची (तोडकाम) कारवाई देखील करण्यात आली आहे. ​ही कारवाई महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि कर विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईमुळे टिटवाळा परिसरातील मोठ्या थकबाकीदारांचे धाबे दणाणले असून, थकीत कर वसुलीची ही मोहीम यापुढेही अशीच तीव्रपणे सुरू राहणार आहे. कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदार करदात्यांनी आपली मालमत्ता व पाणीपट्टीवरील थकीत कराचा भरणा तातडीने करावा, असे आवाहन कर विभागाने केले आहे.

Note : अपलोड प्रतिमा AI तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments