Hamara Mahanagar News

"डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याने ₹१८,१३० कोटींच्या मेट्रो विस्ताराला गती; मग एका पत्रावर संपूर्ण श्रेय कसे?" – विक्की भुल्लर यांचा आमदारांना सवाल

उल्हासनगर : कल्याण लोकसभा युवासेना सचिव तथा उल्हासनगर रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर यांनी उल्हासनगर मेट्रोच्या श्रेयावरून सुरू असलेल्या चर्चेवर प्रतिक्रिया देत आमदारांना अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

भुल्लर म्हणाले, "आमदार साहेब, मेट्रोचे श्रेय घ्यायला आमचा कोणताही विरोध नाही. मात्र प्रत्येक गोष्टीचे श्रेय एकट्याने घेण्याचा प्रयत्न योग्य नाही. उल्हासनगर मेट्रो हा अनेकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम आहे."


ते पुढे म्हणाले, "कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी MMRDA अधिकाऱ्यांसोबत सातत्याने बैठका घेत मेट्रो-५चा उल्हासनगर व अंबरनाथ बदलापूर पर्यंत विस्तार व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे मेट्रो-५ विस्तारासाठी ₹१८,१३० कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. तसेच मेट्रो-१२ विस्तारासाठी ₹८,४१४ कोटींच्या निधीलाही मंजुरी मिळाली. या सर्व प्रक्रियेत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून त्याची माहिती त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमांवर उपलब्ध आहे."

भुल्लर यांनी पुढे सांगितले, "तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने मेट्रो प्रकल्पाच्या निर्णय प्रक्रियेला गती दिली. आपण स्वतः पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याचे सांगितले होते. मग आज त्या योगदानाचा उल्लेख न करता केवळ स्वतःच संपूर्ण श्रेय घेणे योग्य कसे?"

त्यानंतर त्यांनी आमदारांना थेट प्रश्न विचारला. "जर आपल्या एका पत्रामुळेच ₹१८,१३० कोटींच्या मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळत असेल, तर त्याच पत्रावर उल्हासनगर महानगरपालिका साधी  अवैध निर्माण वर  तोडक कारवाई, अतिक्रमण हटविण्याची कारवाई किंवा इतर प्रशासकीय निर्णय का घेत नाही..? आणि जर आपल्या पत्राचे एवढेच वजन असेल, तर अंबरनाथ शहरात ज्या प्रमाणात विकासकामे झाली, तशी विकासकामे उल्हासनगरमध्ये का झाली नाहीत? उल्हासनगरला त्याच प्रमाणात निधी आणि विकास का मिळाला नाही?" असा सवाल त्यांनी केला.

भुल्लर पुढे म्हणाले, "आमचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे नेहमी सांगतात की भाजप हा आमचा मित्रपक्ष आहे. युतीधर्म जपत ते अनावश्यक राजकारण करण्यापेक्षा विकासकामांना प्राधान्य देतात. त्यामुळे अनेक गोष्टींची माहिती असूनही त्यांनी मित्रपक्षाचा मान राखला. डॉ. श्रीकांत शिंदे हे श्रेयाच्या राजकारणावर नव्हे, तर कामाच्या राजकारणावर विश्वास ठेवतात."

शेवटी भुल्लर म्हणाले, "उल्हासनगरच्या जनतेला श्रेयवाद नको आहे. त्यांना स्मार्ट मीटर, स्वच्छ पानी ,खड्डेमुक्त रस्ते, सक्षम महानगरपालिका, शहरातील मैदानांचा विकास आणि मूलभूत सुविधांसाठी ठोस निधी व काम हवे आहे."

Post a Comment

0 Comments