उल्हासनगर | प्रतिनिधी
उल्हासनगरच्या महापौर अड. अश्विनी निकम यांनी सोशल मीडियावर कमलेश निकम यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या पोस्टमध्ये "शिवसेनेचे नेते कमलेश निकम" असा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे. या उल्लेखावर काही शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, हा अधिकार महापौरांना कोणी दिला, असा सवाल उपस्थित केला आहे.
नाराज कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, शिवसेनेमध्ये "नेते" ही पदवी परंपरेने पक्षश्रेष्ठींकडून दिली जाते. त्यामुळे कोणत्याही स्थानिक पदाधिकाऱ्याने किंवा महापौरांनी स्वतःहून कोणालाही "शिवसेना नेते" म्हणून संबोधणे योग्य नाही. यामुळे पक्षाच्या परंपरा आणि शिस्तीबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांचे मत आहे.
काही कार्यकर्त्यांनी असा आरोपही केला की, गुवाहाटी दौऱ्यावरील खर्चाच्या चर्चेनंतर पुन्हा एकदा अशा पोस्टमुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान दिले जात असून, नव्याने आलेल्या व्यक्तींना अधिक महत्त्व दिले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी पक्षाची अधिकृत भूमिका जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, बातमी प्रसिद्ध होईपर्यंत त्यांच्याकडून फोनला प्रतिसाद मिळाला नाही. त्यांची प्रतिक्रिया प्राप्त झाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल.
दरम्यान, या प्रकरणावर शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून अधिकृत भूमिका काय घेतली जाते, याकडे आता कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
टीप: बातमीत नमूद केलेली काही विधाने संबंधित कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली मते किंवा आरोप आहेत. त्यांची स्वतंत्र पडताळणी झालेली नाही आणि संबंधित पक्षांची अधिकृत भूमिका उपलब्ध झाल्यास तीही प्रसिद्ध केली जाईल.
0 Comments