Hamara Mahanagar News

महानगरपालिकेच्या हजेरी शेडवर कब्जाचा आरोप; शेजारील अनधिकृत बांधकामाकडे प्रभाग अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष? – शिवसेना विभागप्रमुख प्रमोद पांडेय



उल्हासनगर | प्रतिनिधी
उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधील साधूबेला परिसरात असलेल्या महानगरपालिकेच्या हजेरी शेडवर अतिक्रमण करून जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना विभागप्रमुख प्रमोद पांडेय यांनी केला आहे. तसेच, हजेरी शेडला लागून सुरू असलेल्या कथित अनधिकृत बांधकामावरही संबंधित प्रभाग अधिकारी कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
प्रमोद पांडेय यांनी सांगितले की, या प्रकरणाची अधिकृत लेखी तक्रार उल्हासनगर महानगरपालिकेकडे सादर करण्यात आली असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी व प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले.
याबाबत पांडेय म्हणाले, "महानगरपालिकेच्या स्वतःच्या मालकीच्या जागेचे संरक्षण प्रशासन करू शकत नसेल आणि शेजारील कथित अनधिकृत बांधकामावर कारवाई होत नसेल, तर सामान्य नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण कसे होणार?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
याशिवाय, पांडेय यांनी असा दावा केला की संबंधित बांधकामाशी संबंधित व्यक्तीकडून अधिकाऱ्यांना कथितपणे असे सांगितले जात आहे की, "मी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पैसे देऊन काम करत आहे. त्यामुळे माझ्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. आयुक्त आले तरी माझे काम थांबणार नाही." या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
या कथित वक्तव्याची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही प्रमोद पांडेय यांनी केली आहे.
साधूबेला परिसरातील या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, महानगरपालिकेने तातडीने अतिक्रमण हटवून कथित अनधिकृत बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शिवसेना विभागप्रमुख प्रमोद पांडेय यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments