उल्हासनगर, प्रतिनिधी : उल्हासनगर-३ येथील चोपडा कोर्ट परिसरातील के.के. रॉयल रेसिडन्सी लॉजिंग अँड बोर्डिंग विरोधात युवासेनेचे कल्याण जिल्हा सचिव तथा कै. रमाकांत चव्हाण रिक्षा युनियनचे अध्यक्ष हरजिंदरसिंह राजेंद्रसिंह भुल्लर (विस्को) यांनी पोलीस आयुक्त, ठाणे, राज्य उत्पादन शुल्क विभाग, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच संबंधित शासकीय विभागांकडे सविस्तर लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत संबंधित लॉजिंगचा परवाना तात्काळ रद्द करून मालक व व्यवस्थापनावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, चोपडा कोर्ट परिसरातील सदर लॉजिंगमुळे स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा भाग दाट लोकवस्तीचा असून येथे गरीब, कष्टकरी व सर्वसामान्य कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यामुळे परिसरातील महिला, युवक-युवती आणि नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, संबंधित लॉजिंगच्या जवळच जयहिंद इंग्लिश हायस्कूल, दिवाणी व फौजदारी न्यायालय तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. या परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी कोणतेही बेकायदेशीर प्रकार सुरू असल्यास त्याची तात्काळ संयुक्त चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
युवासेनेने पोलीस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि संबंधित प्रशासनाने संयुक्त तपासणी करून लॉजिंगचे सर्व परवाने, पाहुण्यांच्या नोंदवही, सीसीटीव्ही फुटेज, ओळखपत्र पडताळणी तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी करावी, अशी मागणी केली आहे. तपासात कोणतेही नियमबाह्य अथवा बेकायदेशीर प्रकार आढळल्यास भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, राज्य उत्पादन शुल्क अधिनियम, सराय अधिनियम तसेच इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तांकडे स्वतंत्र मागणी करण्यात आली असून संबंधित लॉजिंगचे बांधकाम नियमबाह्य अथवा अनधिकृत आहे का, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बांधकामासंदर्भातील मंजूर नकाशे, परवानग्या आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करून अनधिकृत बांधकाम आढळल्यास महानगरपालिका अधिनियम व लागू नियमांनुसार तात्काळ तोडक कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान, या तक्रारीसंदर्भात संबंधित के.के. रॉयल रेसिडन्सी लॉजिंगच्या मालकाची भूमिका जाणून घेण्यासाठी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, वृत्त लिहिपर्यंत त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांची अधिकृत भूमिका मिळू शकलेली नाही. ती प्राप्त झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात येईल.
प्रशासनाने या गंभीर तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यास चोपडा कोर्ट परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा युवासेनेने दिला आहे.
0 Comments