उल्हासनगर | प्रतिनिधी
रमाकांत चव्हाण रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर यांच्या पुढाकारातून उल्हासनगरातील अमराठी व हिंदीभाषिक रिक्षाचालक आणि रिक्षामालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा प्रशिक्षण उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमामुळे रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकण्याची आणि प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली.
दि. 30 जून 2026 ते 10 जुलै 2026 या कालावधीत आयोजित प्रशिक्षणामध्ये 650 हून अधिक रिक्षाचालक व रिक्षामालकांनी प्रवेश घेऊन प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले.
हा उपक्रम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रेरणेने तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
प्रशिक्षणादरम्यान प्रा. डॉ. प्रकाश माळी (प्रशिक्षण समन्वयक), श्री. प्रल्हाद कोलते (केंद्र प्रमुख), प्रमोद पांडेय, निखिल पाटील तसेच प्रशिक्षक श्री. ईश्वर सपकाळे, श्री. प्रमोद पाटील, श्री. राहुल जैन आणि डॉ. गोविंद गायकवाड यांनी मराठी भाषेचे महत्त्व, दैनंदिन व्यवहारातील वापर, प्रवाशांशी प्रभावी संवाद साधण्याची पद्धत तसेच प्राथमिक मराठी संभाषणाचे प्रशिक्षण दिले.
उपस्थित रिक्षाचालकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत नियमितपणे प्रशिक्षण पूर्ण केले.
आयोजकांच्या माहितीनुसार, प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व सहभागी रिक्षाचालकांना महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर यांच्या या उपक्रमाला रिक्षाचालक आणि रिक्षामालकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून, मोठ्या संख्येने चालकांनी मराठी भाषा शिकण्याबाबत उत्सुकता दर्शविली आहे. या उपक्रमामुळे मराठी भाषेचा प्रसार होण्याबरोबरच रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यातील संवाद अधिक सुलभ, सुसंवादी आणि प्रभावी होण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
"चला मराठी बोलूया... आओ मराठी बोलेंगे!"
या संदेशासह हा उपक्रम उल्हासनगरमध्ये यशस्वीपणे पूर्ण झाला असून, सहभागी रिक्षाचालकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
0 Comments