टिटवाळा | प्रतिनिधी
टिटवाळा येथील रिजेन्सी सर्वम गृहसंकुलातील मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकबाकीच्या कारणावरून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) पाणीपुरवठा खंडित केल्याने हजारो रहिवाशांवर मोठे संकट कोसळले आहे. कडक उन्हाळ्यात अचानक पाणी बंद झाल्याने महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होत असून, ही बाब आता गंभीर मानवीय प्रश्न बनली आहे.
या पार्श्वभूमीवर बिपिन कैलाशनाथ सिंह यांनी समस्त रहिवाशांच्या वतीने मा. महापौर महोदया, KDMC यांना निवेदन देत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
रहिवाशांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, कर भरणे हे नागरिकांचे कर्तव्य असल्याची जाणीव असूनही, थकबाकीवर वाढलेले व्याज व दंड यामुळे एकरकमी रक्कम भरणे अनेक कुटुंबांसाठी कठीण झाले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद करण्याऐवजी नागरिकांना दिलासा देणारा मार्ग अवलंबावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
१) KDMCमध्ये ‘अभय योजना’ लागू करावी
उल्हासनगर महानगरपालिकेप्रमाणे थकबाकीदारांसाठी व्याज व दंडात मोठी सवलत देणारी अभय योजना KDMCनेही लागू करावी, विशेषतः टिटवाळा परिसरातील नागरिकांसाठी. यामुळे नागरिक स्वयंस्फूर्तीने थकीत कर भरण्यास पुढे येतील, असा विश्वास रहिवाशांनी व्यक्त केला आहे.
२) पाणीपुरवठा तात्काळ पूर्ववत करावा
सध्याच्या उष्णतेत पाणीपुरवठा खंडित केल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, माणुसकीच्या दृष्टिकोनातून तातडीने पाणी सुरू करावे, अशी कळकळीची मागणी करण्यात आली आहे.
३) संकुलातच विशेष वसुली कॅम्प घ्यावा
महानगरपालिकेने रिजेन्सी सर्वम संकुलाच्या आवारात १ ते २ दिवसांचा विशेष वसुली कॅम्प आयोजित करावा, जेणेकरून रहिवासी जागेवरच थकीत कर भरू शकतील.
रहिवाशांनी महापौरांना दिलेल्या निवेदनात असेही नमूद केले आहे की, दंडात सवलत, व्याज माफी आणि हप्त्यांची सोय उपलब्ध करून दिल्यास सर्व नागरिक प्रशासनाला पूर्ण सहकार्य करतील.
आता KDMC प्रशासन आणि महापौर या गंभीर प्रश्नाकडे कितपत संवेदनशीलतेने पाहतात, आणि टिटवाळ्यातील हजारो नागरिकांना पाण्याच्या संकटातून दिलासा मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments