Hamara Mahanagar News

विकासाच्या राजकारणाला आपले प्राधान्य, कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

डोंबिवली दि.6 डिसेंबर :
आपण महायुतीचा कार्यकर्ता असून कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेवर महापौर महायुतीचाच कसा बसेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगत कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महायुतीमध्ये सुरू असलेल्या नाराजीनाट्यावर पडदा टाकला. तसेच आपण सुरुवातीपासून विकासाचे राजकारण करण्याला प्राधान्य दिले असून यापुढेही आपला तोच दृष्टिकोन असेल अशा शब्दांत खा. शिंदे यांनी आपली पुढची दिशाही स्पष्ट केली. 

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी डोंबिवली येथील वै.ह.भ.प. संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलाच्या पुनर्विकासाच्या कामाचे आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन पार पडले. सुमारे १८० कोटी रुपयांच्या निधीतून क्रीडा संकुलाच्या टप्पा - १ ची उभारणी करण्यात येणार आहे. तर १५ कोटी रुपयांच्या निधीतून सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे नूतनीकरणाच्या पहिल्या टप्प्याची उभारणी करण्यात येणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही कामे आज मार्गी लागत आहेत. याचसमवेत क्रीडा संकुलाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या प्रेरणा वॉर मेमोरिअलचे उदघाटन यावेळी करण्यात आले. डोंबिवली येथील वै.ह.भ.प. संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडांगणात हा कार्यक्रम पार पडला. 

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी धुरा सांभाळल्यानंतर  कल्याण–डोंबिवलीमध्ये अभूतपूर्व निधी येऊ लागला. तर 2014 पूर्वीची आणि आजची परिस्थिती यात जमीन–अस्मानाचा फरक पडला आहे. “2014 मध्ये तुम्ही मला खासदार म्हणून निवडून दिले. पूर्वी खासदारांची भूमिका रेल्वे, MTNL, BSNLपुरती मर्यादित होती. आज लोक आम्हाला कचरा उचलण्याच्या कामासाठीही फोन करतात. लोकांसाठी कोणतेही काम लहान नसते,”असेही खा. डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले.

Post a Comment

0 Comments