डोंबिवली दि.7 डिसेंबर :
गेल्या काही आठवड्यांपासून महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना आणि भाजपमध्ये पक्ष फोडाफोडीवरून सुरू असणारे राजकीय कोल्डवॉर आता थांबल्याचे आणखी एक मोठे उदाहरण समोर आले आहे. काल डोंबिवलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या विकासकामांच्या भूमीपूजन सोहळ्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीही उपस्थित राहत महायुतीमध्ये सारे काही आलबेल असल्याचे संकेत दिले होते. त्यापाठोपाठ भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज घेतलेल्या आणखी एका मोठ्या निर्णयामुळे शिवसेना भाजपमधील राजकीय संबंध आणखी सलोख्याचे करण्याच्या दिशेने पुढचे पाऊल टाकले आहे.
शिवसेनेतील युवा कार्यकर्ता अभिजीत थरवळ याच्या भाजपमधील पक्ष प्रवेशाला प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज स्थगिती दिली आहे. यासंदर्भात चव्हाण यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट करत या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यामूळे काल डोंबिवलीतील दौऱ्यामध्ये कार्यक्रमाच्या स्टेजवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यामधील चर्चेनंतर झालेली ही सर्वात मोठी राजकीय घडामोड समजली जात आहे.
कल्याण डोंबिवलीतील विरोधकांना आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा शिवसेना आणि भाजपच्या घरात येऊन पोहोचली होती. ज्याचे तीव्र पडसाद आधी राज्याच्या सर्वोच्च राजकारणात आणि त्यानंतर थेट दिल्लीपर्यंत उमटल्याचे दिसून आले. एकमेकांचे पदाधिकारी आपल्याकडे ओढण्याच्या स्पर्धेत शिवसेना आणि भाजपमधील सबंध इतके ताणले गेले की नव्वदच्या दशकातील युतीच्या मूळ शिल्पकारांची आणि त्यांनी आखून दिलेल्या महायुती धर्माची आठवण करून द्यायची वेळ दोघांवर आली. इतकेच नाही तर दोघांनीही एकमेकांवर डोळे वटारून आणि पंजे उगारत दंड थोपटत आव्हान - प्रति आव्हानंही दिली.
मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली दौरा करत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना महायुतीमधील हा तणाव कमी होण्याच्या दिशेने सुरुवात झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी भाजप शिवसेना यापुढे एकदिलाने महायुती म्हणून काम करेल आणि एकमेकांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना प्रवेश देणार नसल्याचा निर्णय झाल्याचे कोकणातील पत्रकार परिषदेत जाहीर केले. आणि कल्याण डोंबिवलीतील फोडाफोडीवरुन महायुतीमध्ये सुरू झालेल्या राजकीय वादावर अखेर पडदा टाकण्याच्या दिशेने सुरुवात केली.
0 Comments