Hamara Mahanagar News

विक्की भुल्लर यांच्या पुढाकाराने ‘महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा!’ अभियानाला यश; रिक्षा चालक-मालकांना प्रमाणपत्रांचे वितरणमराठी भाषा प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या रिक्षा चालक-मालकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव; उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद



उल्हासनगर : रमाकांत चव्हाण रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष श्री. हरजिंदर सिंह (विक्की) भुल्लर यांच्या पुढाकाराने रिक्षा चालक-मालक बंधूंसाठी राबविण्यात आलेल्या “महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा!” या मराठी भाषा प्रशिक्षण उपक्रमाचा प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या रिक्षा चालक-मालक बंधूंना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. दैनंदिन व्यवसायातून वेळ काढून मराठी भाषा शिकण्यासाठी सहभागी झालेल्या रिक्षा चालक-मालकांच्या मेहनतीचा आणि मराठी शिकण्याच्या जिद्दीचा यावेळी सन्मान करण्यात आला.


प्रमाणपत्रावर “अमराठी भाषकांसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान” असा उल्लेख करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.


या अभियानाला मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्रा पवार, उद्योग मंत्री व मराठी भाषा मंत्री मा. श्री. उदय सामंत तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र वितरण

या सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. गोपाळजी लांडगे, महापौर सौ. अश्विनी निकम, उपमहापौर श्री. अमर लुंड, उपजिल्हाप्रमुख व सभागृह नेता श्री. अरुण अशान, महानगरप्रमुख व नगरसेवक श्री. राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख/ज्येष्ठ नगरसेवक श्री. राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज), माजी शहरप्रमुख श्री. रमेश चव्हाण, कल्याण लोकसभा सचिव श्री. हरजिंदर सिंह (विक्की) भुल्लर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केलेल्या रिक्षा चालक-मालक बंधूंना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

प्रशिक्षकांचा विशेष सत्कार

प्रशिक्षण उपक्रमात मोलाचे योगदान देणारे केंद्र संचालक श्री. प्रकाश माळी सर, केंद्र प्रमुख श्री. प्रहलाद कोळते सर, श्री. निखिल पाटील, श्री. प्रमोद पांडेय, प्रशिक्षक श्री. राहुल जैन आणि डॉ. गोविंद गायकवाड यांचा रमाकांत चव्हाण रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.


रिक्षा चालक-मालक बंधूंनी मानले विक्की भुल्लर यांचे आभार

मराठी भाषा प्रशिक्षणाचा उपक्रम यशस्वीपणे राबवून रिक्षा चालक-मालक बंधूंना प्रमाणपत्र मिळावे यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल श्री. हरजिंदर सिंह (विक्की) भुल्लर यांचे उपस्थित रिक्षा चालक-मालक बंधूंनी कौतुक करून मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

यावेळी “आपण वेळ दिलात, मेहनत घेतलीत, मनापासून शिकला आणि सहभाग घेतला… आज त्या मेहनतीचा सन्मान आपल्या हातात प्रमाणपत्राच्या रूपाने आला आहे,” अशी भावना व्यक्त करण्यात आली.

“चला मराठी बोलूया… आओ मराठी बोलेंगे!” या संदेशाने कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण समारोप करण्यात आला.

Post a Comment

0 Comments