उल्हासनगर : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उल्हासनगरमधील शिवसेनेच्या ‘RRR’ त्रिकुटाने पुढाकार घेतल्याने सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शिवसेना महानगरप्रमुख तथा नगरसेवक राजेंद्र चौधरी, शिवसेना शहरप्रमुख तथा ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) आणि नगरसेवक रमेश चव्हाण यांनी एकत्रितपणे तब्बल ३ लाख १२ हजार १११ रुपयांचे आर्थिक योगदान दिले आहे.
विशेष म्हणजे, उल्हासनगर शहरातील शिवसेना नगरसेवकांमधून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वप्रथम पुढाकार घेणारे दानशूर लोकप्रतिनिधी म्हणून ‘RRR’ त्रिकुटाची चर्चा रंगू लागली आहे. शहरातील जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या या त्रिकुटाने आता महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या मदतीसाठीही आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योगदान देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत राजेंद्र चौधरी यांनी १ लाख १ हजार रुपये, राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांनी १ लाख ११ हजार १११ रुपये, तर रमेश चव्हाण यांनी १ लाख रुपये दिले. या तिन्ही लोकप्रतिनिधींनी मदतीचा धनादेश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.
जनसेवेबरोबरच दातृत्वाचीही छाप!
उल्हासनगरच्या राजकारणात ‘RRR’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या या त्रिकुटाने केवळ शहरातील विकासकामे आणि जनतेच्या प्रश्नांपुरते मर्यादित न राहता, राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठीही हात पुढे केला आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक होत असून, लोकप्रतिनिधींनी सामाजिक बांधिलकी कशी जपावी, याचे उदाहरण म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.
शहराच्या विकासासाठी तत्पर असणारे हात आज शेतकऱ्यांच्या मदतीसाठीही पुढे सरसावले आहेत. राजकारणापलीकडे जाऊन संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना मदत करण्याची भावना या योगदानातून व्यक्त झाली आहे.
‘RRR’ त्रिकुटाचा दातृत्वाचा पुढाकार; उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर कौतुकाची चर्चा!
0 Comments