Hamara Mahanagar News

बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांपेक्षा पप्पू कलानी मोठे नेते आहेत का? महापौरांच्या पोस्टवरून शिवसैनिकांचा संतप्त सवाल..!


उल्हासनगर | प्रतिनिधी
उल्हासनगर शहराच्या स्थापना दिनानिमित्त सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या महापौरांच्या पोस्टवरून आता शिवसैनिकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. पोस्टमध्ये अनेक नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे फोटो दिसत असताना शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची छायाचित्रे मात्र कुठेच दिसत नाहीत, यावरून शिवसैनिकांनी थेट सवाल उपस्थित केला आहे.
“महापौरांना बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यापेक्षा पप्पू कलानी मोठे नेते वाटतात का?” असा भावनिक आणि बोचरा प्रश्न आता सोशल मीडियावर विचारला जात आहे.
बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांसाठी केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर शिवसैनिकांच्या रक्तात आणि मनात रुजलेला विचार होते. धर्मवीर आनंद दिघे साहेब हे ठाणे जिल्ह्यातील असंख्य शिवसैनिकांसाठी संघर्ष, त्याग आणि हिंदुत्वाचे प्रतीक होते. या दोन महान व्यक्तिमत्त्वांचा फोटो एखाद्या शिवसेनेच्या अधिकृत पदावरील व्यक्तीच्या शुभेच्छा पोस्टमध्ये नसणे, ही बाब अनेक शिवसैनिकांच्या जिव्हारी लागली आहे.

आज प्रश्न केवळ एका फोटोचा नाही.
प्रश्न आहे विचारांचा…
प्रश्न आहे निष्ठेचा…
प्रश्न आहे शिवसेनेच्या संस्कारांचा…

आणि प्रश्न आहे शिवसैनिकांच्या भावनेचा!
शिवसेनेच्या प्रशिक्षण शिबिरात नुकतेच सोशल मीडिया वापराबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मग अशा पोस्ट तयार करताना शिवसेनेच्या विचारांचे आद्यप्रेरणास्थान असलेले बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर दिघे साहेब यांना स्थान देणे वरिष्ठांच्या किंवा संबंधित पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले नाही का? असा सवालही शिवसैनिक उपस्थित करत आहेत.

त्याहून गंभीर प्रश्न असा की—
“ही शिवसेनेच्या महापौरांची पोस्ट आहे की पक्षाच्या मूळ विचारधारेपासून दूर जाण्याचे उदाहरण?”

शिवसैनिकांच्या मनात आज हा प्रश्न निर्माण झाला आहे.पप्पू कलानी यांचा राजकीय इतिहास किंवा स्थान यावर प्रश्न उपस्थित करण्याचा हेतू नाही. मात्र, ज्या पक्षाच्या नावाने शुभेच्छा दिल्या जात आहेत, त्या पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना सन्मानाचे स्थान देणे ही किमान अपेक्षा नाही का?

बाळासाहेबांचा फोटो लावायला जागा नाही,
दिघे साहेबांचा फोटो लावायला जागा नाही,
पण स्वतःच्या फोटोसाठी मात्र पुरेशी जागा आहे…
मग शिवसैनिकांनी प्रश्न विचारायचा नाही का?
हा प्रश्न कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नसून शिवसेनेवर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाच्या मनातील वेदना आहे.

Post a Comment

0 Comments