🚨 युवासेना सचिव हरजिंदर सिंह भुल्लर (विक्की) यांचा थेट इशारा: महावितरण झोपलंय का? उल्हासनगर कवरराम अपार्टमेंटमधील कथित वीज चोरीवर तात्काळ कारवाई करा, नाहीतर आंदोलन!
न्यूज:
उल्हासनगर शहरात महावितरण कंपनीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे प्रकरण समोर आले आहे. उल्हासनगर-3 येथील कवरराम अपार्टमेंट (बिलिंग युनिट 4172, पी.सी. क्रमांक 6) या नव्या अनधिकृत इमारतीत मागील सुमारे 6 महिन्यांपासून वीज वापरात मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
माहितीनुसार, या इमारतीत अधिकृत वीज मीटर नसतानाही जवळपास 40 फ्लॅटमध्ये डायरेक्ट लाईनद्वारे वीज वापर सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, येथे असलेल्या एकमेव अधिकृत मीटरवर देखील शून्य (0) युनिटचे बिल येत असल्याचे समोर आले असून संबंधित ग्राहक क्रमांक 021513785132 असा आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ वीज चोरीपुरता मर्यादित नसून, संपूर्ण यंत्रणेमधील गंभीर त्रुटी किंवा संगनमताची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित बिल्डर उघडपणे सांगत आहे की, तो काही अधिकाऱ्यांना दर महिन्याला पैसे देतो, त्यामुळे कोणतीही कारवाई होत नाही. या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसली तरी, इतक्या मोठ्या प्रमाणावर वीज वापर होत असताना कारवाईचा अभाव संशय अधिक गडद करत आहे.
परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या दुहेरी धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “सामान्य ग्राहकांचे वीज बिल थोडे जरी थकले तरी तात्काळ लाईन कट करण्यासाठी कर्मचारी घरी पोहोचतात, दबाव टाकतात. पण जिथे मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होत आहे, तिथे मात्र कोणतीही कारवाई होत नाही,” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, युवासेना लोकसभा सचिव हरजिंदर सिंह भुल्लर (विक्की) यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत महावितरण प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “महावितरणचा स्क्वॉड आणि अधिकारी वर्गाला एवढी मोठी वीज चोरी दिसत नाही का? जर तात्काळ कारवाई झाली नाही, तर आम्ही आंदोलन उभारू. तसेच अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई झाली पाहिजे.”
या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी तात्काळ चौकशी करून बेकायदेशीर वीज पुरवठा बंद करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
0 Comments