Hamara Mahanagar News

⚡ “उल्हासनगर 1 मध्ये महावितरण कार्यालय असताना सेवा 3 ला का..? वरिष्ठ अधिकारी यांचा लक्ष का नाही?” — भुल्लर महाराजांचा सवाल; बिलिंग स्टाफ तात्काळ पुन्हा सारखा सुरू करण्याची मागणी!


उल्हासनगर | प्रतिनिधी
उल्हासनगर उपविभाग क्र. १ परिसरातील नागरिकांना वीज संबंधित कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पी.सी. क्लर्क व बिलिंग स्टाफ सेवा मागील सहा महिन्यांपासून साईबाबा कार्यालय (उल्हासनगर-३) येथे स्थलांतरित केल्याने नागरिकांना ५० ते १०० रुपये खर्च करून रिक्षाने जावे लागत असून, वेळ आणि पैशाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
या परिस्थितीचा गैरफायदा काही दलालांकडून घेतला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. तसेच, कामांमध्ये मुद्दाम विलंब होत असल्याने नागरिकांचा त्रास अधिकच वाढला आहे. पूर्वी स्थानिक स्तरावर सहज उपलब्ध असलेल्या सेवा बंद झाल्याने सर्वसामान्य नागरिक संतप्त झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर शिवसेना शहरप्रमुख व ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंता यांना निवेदन देत, उल्हासनगर उपविभाग क्र. १ येथे पी.सी. क्लर्क व बिलिंग स्टाफ सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच प्रलंबित तक्रारींचे जलद निवारण करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी भुल्लर महाराज यांनी थेट सवाल उपस्थित केला की, “उल्हासनगर-१ परिसरातच कार्यालय असताना सेवा उल्हासनगर-३ येथे का हलवण्यात आली? ग्राहकांचे बिल न भरल्यास तत्काळ विद्युत पुरवठा खंडित केला जातो, मग चुकीच्या बिल दुरुस्तीसाठी ग्राहकांनी उल्हासनगर-३ येथे का जावे?”

तसेच, “आमदार साहेब महावितरण कर्मचाऱ्यांच्या बैठका घेतात, मात्र जनतेच्या अशा मूलभूत प्रश्नांकडे लक्ष का दिले जात नाही? जनता फक्त मतदानासाठी नाही, हिच जनता त्यांना निवडून आणते,” असा रोखठोक सवालही त्यांनी केला.

“अशा समस्या तात्काळ सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन व लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नाकडे किती गांभीर्याने लक्ष देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments