उल्हासनगर दि.12 नोव्हेंबर :
उल्हासनगर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती ही अभेद्यच असल्याचे आश्वासक असे चित्र आज दिसले. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपाइं, लहुजी सेना महायतीचे उमेदवार कुमार आयलानी यांच्या खांद्याला खांदा लावत शिवसेनेचे विक्की भुल्लर हे निवडणूक प्रचारात सहभागी झाल्याचे दिसून आले. महायुती ही अभेद्यच असल्याचे सूतोवाच महायुती उमेदवार कुमार आयलानी यांनी यावेळी केले. तर कुमार आयलानी यांच्या विजयासाठी आपण संपूर्ण ताकद पणाला लावू असा निर्धार यावेळी विक्की भुल्लर यांनी व्यक्त केले.
उल्हासनगर 141 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार कुमार आयलानी यांनी प्रचाराचा धडाका लावला असून आज संध्याकाळी शहड फाटक,धोभीघाट,फर्निचर मार्केट परिसरात त्यांची प्रचार रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये काही दिवसांपूर्वी कुमार आयलानी व भाजप अध्यक्ष प्रदीप रामचंदनी यांच्या विरोधात पत्रकार परिषद मध्ये काम न करण्याचा इशारा देणारे विक्की भुल्लर आणि आता महायुतीला पाठिंबा देणारे शिवसेनेचे विक्की भुल्लर यांनीही आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह सक्रिय सहभाग घेतला होता.
महायुती म्हणूनच एकत्र लढणार आणि जिंकणारही - कुमार आयलानी
विक्की भुल्लर यांनी पक्षादेश शिरसावंद्य मानत एक पाऊल मागे घेत एक आदर्श कार्यकर्ता कसा असतो याचा दाखला सर्वांसमोर घालून दिला आहे. आपण याआधीही सांगितले होते की महायुती अभेद्य आणि अभेद्यच राहणार आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपाइं, लहुजी सेनेचे प्रमूख नेते कार्यकर्ते इकडे उपस्थित असून या एकीचा प्रत्यय येत आहे. आम्ही सर्व जण महायुती म्हणूनच एकत्र लढणार आणि जिंकणारही असा ठाम विश्वास उमेदवार कुमार आयलानी यांनी यावेळी व्यक्त केला.
आपली सर्व मते आयलानी यांना मिळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार - शिवसेनेचे विक्की भुल्लर
कुमार आयलानी यांनी आपल्या आमदारकीच्या काळात सगळ्यांनाच मदत होईल असे काम केले आहे. आपल्या पाठीशी असणारी सर्वच्या सर्व मते ही कुमार आयलानी यांच्या पाठीशी उभी करून रेकॉर्ड ब्रेक मतांनी उल्हासनगर 141 विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा विजय होईल यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विक्की भुल्लर यांनी दिली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख दिलीप गायकवाड, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी,उपशहर प्रमुख जयकुमार केणी,सुरेश सोनवणे, विभागप्रमुख विनोद साळेकर,प्रमोद पांडेय भाजप चे माजी नगरसेवक जमनु पुरस्वनी, राम चार्ली, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments