कल्याण डोंबिवली दि.24 ऑक्टोबर :
भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या (गुरुवारी 24 ऑक्टोबर 2024) कल्याण डोंबिवलीत येणार आहेत. कल्याण डोंबिवलीतील आपापल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी हे दोन्ही दिग्गज नेते उद्या उपस्थित राहणार आहेत.
कल्याण पूर्वेतून भाजपने सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली असून उद्या गुरु पुष्यामृत योगा आहे. या मुहूर्तावर भाजप उमेदवार सुलभा गायकवाड या आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या सकाळी तिसाई हाऊसपासून ते निवडणूक कार्यालयापर्यंत भव्य अशी रॅली काढणार असल्याचेही सुर्यवंशी यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमूख उपस्थिती असणार आहे. त्यांच्यासह महायुतीचे इतर नेतेही यावेळी उपस्थित असतील असेही सुर्यवंशी यांनी यावेळी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यादेखील उपस्थित होत्या.
तर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे आमदार राजू पाटील हेदेखील उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहणार असल्याचे दस्तुर खुद्द राज ठाकरे यांनीच जाहीर केले आहे. परवा झालेल्या राजू पाटील यांच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात राज ठाकरे यांनी आपण राजू पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राज ठाकरे उद्या उपस्थित राहून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल आणखी वाढवणार आहेत.
0 Comments