मुंबई : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) प्रतिबंधित पान मसाल्याच्या कथित अप्रत्यक्ष जाहिरातीप्रकरणी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे.
‘विमल इलायची’ या उत्पादनाच्या जाहिरातींच्या माध्यमातून प्रतिबंधित पान मसाल्याचे कथित सरोगेट प्रमोशन केले जात असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर FDAने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.
संबंधित अभिनेत्यांना जाहिरात मोहिम थांबविणे, संबंधित प्रचारात्मक सामग्री हटविणे तसेच जाहिरातींसाठी करण्यात आलेल्या एंडोर्समेंट करार आणि आर्थिक व्यवहारांची माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.
नोटीस मिळाल्यानंतर संबंधितांना १५ दिवसांच्या आत आपले स्पष्टीकरण सादर करावे लागणार आहे. निर्धारित मुदतीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास किंवा चौकशीत नियमांचे उल्लंघन आढळल्यास पुढील कायदेशीर कारवाई होऊ शकते.
FDAच्या या कारवाईमुळे सेलिब्रिटींच्या माध्यमातून तंबाखू व पान मसाला उत्पादनांच्या कथित अप्रत्यक्ष जाहिरातींचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विशेषतः मोठ्या बॉलिवूड कलाकारांच्या जाहिरातींवर थेट प्रशासकीय कारवाईची भूमिका घेतल्याने या प्रकरणाकडे देशभराचे लक्ष लागले आहे.
आता संबंधित कलाकार FDAला काय स्पष्टीकरण देतात आणि त्यानंतर प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments