"पार्थिव शिवलिंग विराट संगम" कार्यक्रमावरून उल्हासनगरात शिवसेनेत अंतर्गत गोंधळ; शिंदे गटाच्या बॅनरवर मुख्यनेते एकनाथ शिंदे व स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा फोटो नसल्याने संभ्रम वाढला...?
उल्हासनगर-अंबरनाथ परिसरातील प्राचीन शिव मंदिरात 11 ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान सवा कोटी पार्थिव शिवलिंगांचे विराट पूजन आयोजित करण्यात आले आहे. या ऐतिहासिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे आणि उद्योजक संजय गुप्ता यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनंजय बोडारे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले असून, सर्व शिवसैनिकांना जोरदार तयारी करण्याचे आवाहन केले आहे. प्रयागराज येथून आलेले पूज्य ब्रिजेशानंदजी महाराज या महायज्ञाचे अधिष्ठाता आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाच्या वारशाचे वाहक म्हणून या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
मात्र, उल्हासनगरातील शिवसेना (शिंदे गट) चे उपजिल्हाप्रमुख दिलीप गायकवाड यांनीही या कार्यक्रमासाठी बॅनरबाजी करत सक्रिय सहभाग घेतल्याने उल्हासनगरात चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या बॅनरवर शिंदे गटाचे मुख्यनेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
लोक विचार करत आहेत की, दिलीप गायकवाड यांचे उ.बा.ठा गटाशी अजूनही मधुर संबंध आहेत का? की त्यांनी पक्षनिष्ठा बाजूला ठेवून धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने दुसऱ्या गटाशी समन्वय साधला आहे...?
0 Comments